मुंबई : जानेवारीत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी निधी संकलन करणाऱ्या अशासकीय व सेवाभावी संस्था तसेच वैयक्तिक निधी संकलन केलेल्यांचा 'टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स 2023' देऊन सत्कार राज्यपालांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने मॅरेथॉनच्या माध्यमातून आपले दातृत्व संस्कृती जपली, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात केले.
काय म्हणाले राज्यपाल बैस : राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. दानशूर लोकांचे देखील शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक उपक्रमांकरिता मोठ्या प्रमाणात निधी जमा केला जातो. मुंबईची दातृत्व संस्कृती पुनश्च अधोरेखित झाली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये मुंबई मॅराथॉन देशातली सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन झाली आहे. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 55000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धेच्या लोकप्रियतेची पोचपावती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
खेळाडू देशाचे नाव मोठे करतील :यंदा 252 सेवाभावी संस्था, 177 कॉर्पोरेट्स, 1000 वैयक्तिक निधी संकलक, 17000 दानशूर व्यक्ती यांसह 10000 स्पर्धकांनी विविध समाजकार्यांकरिता निधी संकलित केला. मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाला उत्तम धावपटू व खेळाडू मिळतील व ते देशाचे नाव मोठे करतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. मुंबई मॅरेथॉनमुळे भारताचे नाव जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर आल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.