मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे 'एक्झाम वॉरियर्स' या पुस्तकाचे प्रकाशन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव रनजीत सिंह देओल आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पाच विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर हवा -राज्यपालांनी यावेळी भाषणात, पुस्तकाची प्रस्तावना सांगताना विविध पैलूंवर भाष्य केले. ते म्हणाले की, सध्या सगळे विद्यार्थी परिक्षेच्या तयारीत आहेत. तरीही वेळ काढून राजभवनात आलात. हे ठिकाण अभ्यास करण्यास स्फूर्ती देणारे आहे. येथील वातावरण बघून नवी उर्जा मिळते. पंतप्रधनांन भारत जगात प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असायला हवा, यासाठी प्रयत्न करत आहेत.
प्रगतीच्या दृष्टीने नंबर एक -शस्त्रबळाने किंवा अन्य देशाच्या सीमा बळकावून नव्हे तर, प्रगतीच्या दृष्टीने भारत नंबर एकचा देश बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. ते एक प्रकारे वारियर्सचा काम करत आहेत. जसे सीमेवरील सैनिक लढाई जिंकून विजय मिळवतात, तेव्हा जेवढा आनंद होतो तसा, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केल्यावर आनंद होतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी शालेय मुलांची तुलना सीमेवरील जवानांशी केली आहे. परीक्षेत विद्यार्थी देखील वारियर्सच्या भूमिकेत असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी पुस्तकात केल्याचे राज्यपाल म्हणाले.
डर गया ओ मर गया -कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर, भयमुक्त व्हायला हवे. भयमुक्त झालात तर, उंच आकाशी झेप घेऊ शकता. पहिल्यांदा मनातून भीती काढून टाकायला हवी. मी मंत्री बनू शकतो का, मुख्यमंत्री होईन का, अशी भिती मनात ठेवल्यास प्रगती करु शकत नाहीत. डर गया ओ मर गया, असा फिल्मी डायलॉग मारत केसरकर यांना चिमटा काढला.