राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी - kiran pawar
राज्यपाल कोश्यारी हे एका राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांनी कोणताही भेदभाव करू नये असा प्रघात आहे. पण राज्यपालांचे वर्तन संभ्रमित करणारे आहे. राज्यपाल कोश्यारी एका विशिष्ट संघटनेचे एकेकाळी प्रतिनिधित्व करत होते, तर त्यांनाही आताच्या घडीला त्याच संघाबरोबर जोडायचे का? असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण पवार यांनी केला आहे.
मुंबई- राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उघडपणे आक्षेप नोंदवल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी सोमवारी राज्यातील २६ कॅबिनेट आणि दहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मात्र, ही शपथ घेताना अनेक मंत्र्यांनी राजशिष्टाचार विभागाने नियमित केलेल्या शपथेच्या मजकूराव्यतिरिक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महनीय व्यक्तीच्या स्मृतिला वंदन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी नियमानुसारच शपथ घेण्याचा आग्रह करत मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.