मुंबई : मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते. आता ते प्रत्यक्षात साकारायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातही आमच्या सरकारची ही वचनबद्धता असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४ हजार ४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३ हजार ६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी उपस्थित होते. यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १ कोटीची मदत करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आले आहे.
आज माझ्या वाढदिवसाचे निमित्त ठरवून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम करीत आहेत ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पूर्वी इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल्स स्टेशन राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सिडकोच्या या उपक्रमांचे कौतुक केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच सिडकोच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सांगितले तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणखीही घरे पुढील टप्प्यात सिडकोने उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
घर वाटप पत्र ईमेलद्वारे -
सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना यावेळी इलेकट्रॉनिक पद्धतीने घरांचे वाटपपत्र थेट त्यांच्या मेलमध्ये देण्यात आले. यात सिडको महागृहनिर्माण योजना १ व २, स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना, वास्तुविहार व सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना आणि एनआरआय कॉम्प्लेक्स या योजनांतील वाटपपत्रांचा समावेश होता.
ऑनलाईन सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीकरिताची प्रक्रिया सोपी, जलद व अचूक पद्धतीने व्हावी याकरिता सिडकोद्वारे निवाराकेंद्राची उभारणी केली आहे. करोनाच्या अनुषंगाने संगणक प्रणालीमध्ये बदल करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याद्वारे अर्जदार घरबसल्या आपिलाकरिता कागदपत्रे सिडको निवारा केंद्राच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन जमा करू शकतील. जे अर्जदार कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरतील त्यांचेकरीत अपिलाची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने विकसित केली असून, कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्जदाराने आपल्या खात्यात लॉगइन करून अपील करावे. त्यानंतर अपिलाची माहिती व कागदपत्रे अपलोड करून ती जमा (सबमिट) करणे शक्य आहे.