मुंबई- केंद्र सरकारच्या नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध करत, हे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र, या कायद्यांवरून केंद्र सरकारने माघार घेऊ नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी म्हटले आहे.
आपण वर्षानुवर्ष पाहिले की, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी हीच शेतकरी वर्गावर अन्याय करत आहे. त्याचा बिमोड करायचा म्हणून संसदेत तीन कृषी विषयक कायदे मंजूर झाले, आता इथून सरकारने माघार घेतली तर शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल, सरकारने माघार घेऊ नये, असे शिदोरेंनी ट्विट करून म्हटले आहे.
आज माघार घेतली तर दहा वर्ष मागे जाऊ
शेतीचे भले खुल्या बाजाराशी जोडले जाण्यात आहे, ती दिशा आहे. ज्या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे, ते कायदे त्याच दिशेने जाणारे आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत काही सुधारणा करता येतील. परंतु, आज माघार घेतली तर देशातील एकूण आर्थिक सुधारणांबाबत आपण दहा वर्ष मागे जाऊ, असेही शिदोरे यांनी म्हटले आहे.
लोक माझे सांगाती.. पुस्तकात शरद पवारांचा बाजार समित्यांना विरोध
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या "लोक माझे सांगाती.." या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतो आणि हे नियंत्रण काढले पाहिजे, असे म्हटले असल्याचे समजले. मी पुस्तक वाचलेले नाही पण हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांनी सुप्रिया सुळे यांना ट्विटद्वारे केला आहे. त्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांच्या लोक माझे सांगाती पुस्तकातील ते पान जोडले आहे.