मुंबई - राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन धोरण कुचकामी असून दरवर्षी काहीही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोपही वंचितने केला आहे.
संभाव्य पूर परिस्थितीचे आकलन करण्यास सरकार आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे. पुरात नागरिकाची घरे, शेती, व्यावसायिक साधने, गुरे ढोरे, वाहून गेले किंवा पाण्याखाली गेले आहेत. एकाच पावसाने राज्यातील सुमार दर्जाचे रस्ते, पूल ह्या पूरामुळे पुर्णतः वाहून गेले. सरकारने तातडीने पूरग्रस्तांना प्रत्येकी १० लाख जीवितहानीसाठी आणि पाच लाख आर्थिक मदत त्यांचे बँक खात्यात सरसकट जमा करावी. शेतकरी आणि व्यापारी यांना देखील पुर्नवसन पॅकेजची गरज आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याची गरच आहे. पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफी, शेतकऱ्यांना पाच लाख प्रत्येकी मंजूर करावे.मागील वर्षी आलेल्या पुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली होती. अनेक बाधित पूरग्रस्त मदती पासून वंचित आहेत. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी रस्त्यावर उतरून जनतेला मदत करावी. कागदी घोडे नाचवू नये. बचावकार्य आणि पुर्नवसन कार्य जलद गतीने करावे. तसेच विरोधी पक्ष भाजपने देखील राजकारण न करता केंद्र सरकारकडून अर्थ सहाय्य मंजूर करून आणावे, असे आवाहन देखील वंचित बहूजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले आहे. पुरानंतर संभाव्य रोगराई विरोधात आरोग्य विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दयावी असे ठाकूर यांनी सांगितले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वंचित देखील मैदानातपूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय मदतीसह राजकीय पक्षाने देखील मदतीचा हात पुढे केलेला आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सांगितले होते. त्याबरोबर आज वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. गेल्यावेळी आलेल्या पुरात नुकसान झालेल्या गावांना आपण मदत पोहचवली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे सरकार पोहचू शकले नाही तिथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी मदत पोहचवली होती. या आपत्तीच्या वेळीही आपण सर्वांनी आपत्तीग्रस्तांना सावरण्याची पुढे आम्हि पुढाकार घेणार आहोत असेही ते म्हणाले.