मुंबई :गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी जुनी पेन्शन योजने संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतर मागण्यांसाठी मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. सरकार जुन्या पेंशन बाबत उदासीन असल्याने उद्या १४ मार्चपासून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, आरोग्य, पालिका आदी सर्व विभागातील तब्बल १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.
समितीची स्थापना - दरम्यान, संप न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच या विषयावर एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.
उद्यापासून संपाचा निर्णय : जुन्या पेंशनबाबत सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याबाबत २०१८ आणि २०२२ मध्ये दोन वेळा संप करण्यात आला. त्यावेळी अभयास करू असे सांगण्यात आले. आजही बैठकीत अभ्यास करू असे सांगण्यात आले. यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तातडीची बैठक घेऊन उद्यापासून संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती देण्यासाठी मुंबई प्रेस क्लब येथे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विश्वास काटकर बोलत होते.