मुंबई :राज्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थी आणि शेतकऱ्यांना सध्या डीबीटी पोर्टल मार्फत थेट खात्यात पैसे जमा केले जात आहेत. हे पैसे थेट लाभार्थ्यांना मिळावेत आणि त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जातात. मात्र असे असले तरी कित्येकदा मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंगठ्याचा बनावट वापर करून पैसे काढले जातात. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असतील अथवा शासनाच्या योजनांचा लाभ घेणारे शेतकरी असतील, त्यांच्या नावावर पैसे काढले जातात. याला आळा घालण्यासाठी शासनाने आता प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती परिवहन आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांनी दिली.
लाभार्थी आणि गैरवापर? :राज्यातील विविध शासकीय योजना तसेच शेतकरी कर्जमाफी योजना असेल विद्यार्थ्यांना विविध विभागांमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती असेल अशा सुमारे 50 हून अधिक योजनांचे पैसे डीबीटी पोर्टल मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात. राज्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या खात्यात सुमारे दरवर्षी 7000 कोटी रुपये जमा केले जातात. तर शेतकरी आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हजारो कोटी रुपये खात्यात जमा केले जातात. निवृत्ती वेतन योजनेचे ही हजारो कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात मात्र एखादी व्यक्ती जर मरण पावली तर त्या व्यक्तीची पेन्शन जोपर्यंत त्याला नवीन हयातीचा दाखला द्यावा लागत नाही तोपर्यंत सुरू राहते. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर कित्येकदा एखाद्या व्यक्तीचा बनावट अंगठा तयार करून त्याच्या नावावर पैसे उचलले जात असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या होत्या याबाबत आळा घालण्यासाठी सरकारने नवीन सॉफ्टवेअर आणण्याचा निर्णय घेतला आहे.