मुंबई- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली आश्वासित प्रगती योजना लवकरच राज्यातील शिक्षकांनादेखील लागू होणार आहे. याबाबत बुधवारी राज्य सरकारने समिती गठीत केली असून राज्यातील शिक्षक संघटनांनी त्याचे स्वागत केले आहे. या योजनेचा लाभ सुमारे चार लाखांहून अधिक शिक्षकांना होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सरकारने १० वर्षे, २० वर्षे आणि ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना ही मार्चच्या सुरुवातीला लागू केली आहे. मात्र, त्यात शिक्षकांना डावलण्यात आले होते. याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पाठपुरावा करत ही योजना शिक्षकांनाही लागू करावी अशी मागणी केली होती. यासाठी शिक्षक आमदार नागो गाणार, शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे, निरंजन गिरी, भारत काकड आदींनी याविषयी अनेकदा सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी २४ जुलै रोजी एक जीआर काढून या मुद्यावर एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने ही समिती स्थापन केली आहे.