मुंबई - गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास 13 वर्षापासून रखडला आहे. बिल्डरने सरकार-म्हाडा-रहिवासी यांना चुना लावत 1 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केला आहे. रहिवासी 13 वर्षे बेघर असून 5 वर्षांपासून भाडेही बंद आहे. अशात हा प्रकल्प म्हाडाकडे ताब्यात घेतला असून आता पुनर्विकास मार्गी लागेल अशी आशा रहिवाशांना होती. पण ही आशा खोटी ठरली आहे. आपल्या हक्काच्या घरासाठी आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
तीन वर्षे झाली म्हाडानेही उदासीन धोरण अवलंबत पत्राचाळ येथील रहिवाशांना हक्काच्या घरापासून दूर ठेवले आहे. म्हाडाच्या याच वेळकाढू आणि उदासीन धोरणाला कंटाळलेल्या रहिवाशांनी आता आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. त्यानुसार मंगळवार, 16 फेब्रुवारीपासून रहिवासी साखळी उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत सरकार-म्हाडाकडून हक्काच्या घरासाठी ठोस पाऊल उचलले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा रहिवाशांचा निर्धार आहे.
672 रहिवासी 13 वर्षे बेघर
गोरेगाव येथे पत्राचाळ अर्थात सिद्धार्थनगर नावाची म्हाडा वसाहत आहे. 48 एकरवर ही वसाहत वसली असून यात 672 कुटुंबे राहतात. या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास गुरुआशिष बिल्डरला 2008 मध्ये देण्यात आला. या बिल्डरने रहिवाशांना भाडे देत त्यांना इतरत्र राहण्यास सांगितले आणि मूळ घरे रिकामी करून घेतली. घरे पाडली आणि पुनर्विकासाला सुरुवात केली. पण पुनर्विकास काही पूर्ण केला नाही. दरम्यान, गुरुआशिष बिल्डरने या वसाहतीचा पुनर्विकास हाती घेतल्यानंतर तीन वर्षांनंतर म्हाडाने या प्रकल्पाचे ऑडिट केले असता एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे बिल्डरने हा प्रकल्प परस्पर एक नव्हे तर 9 जणांना विकला होता. यात गैरप्रकारात बिल्डरने म्हाडाला तब्बल 1 हजार कोटींहून अधिकचा चुना लावला आहे. शिवाय, रहिवाशांना बेघर ठेवले आहे. एकूणच, हा घोटाळा उघड झाल्यानंतर याची चौकशी लागली. पुढे बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बिल्डरकडून हा प्रकल्प काढून म्हाडाने प्रकल्प स्वतःकडे घेतला. म्हाडानेही हा प्रकल्प स्वतःकडे घेऊन 3 वर्षे झाली. परंतु, या वसाहतीचा अपूर्ण पुनर्विकास पूर्ण केलेला नाही. 672 रहिवासी आजही बेघर असून हक्काच्या घराची प्रतीक्षा करत आहेत.
हक्काच्या घरासाठी तीव्र आंदोलनाचा निर्णय