महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 26, 2020, 12:33 PM IST

ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची सूत्रे आता सामाजिक न्याय विभागाकडे

राज्यात ८ लाखाहून अधिक ऊसतोड कामगार आहेत. त्यातील बहुतांश कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. असंघटित व असुरक्षित असलेल्या या वर्गाला सामाजिक प्रवाहासह सुरक्षा, आर्थिक उन्नती साधण्याचे मोठे आव्हान असून, अत्यंत आनंदाने आपण ते स्वीकारत आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

gopinath munde sugarcane workers board
धनंजय मुंडे

मुंबई - गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची सूत्रे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून आता सामाजिक न्याय विभागाला सोपवण्यात आली आहेत. पर्यायाने ऊसतोड कामगारांचे कल्याण साधण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आता धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. तसेच मी स्वतः ऊसतोड कुटुंबातील आहे. त्यामुळे ज्या लोकांमध्ये वाढलो, वावरलो त्यांच्या प्रगतीसाठी काम करण्याची खरी संधी असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात ८ लाखाहून अधिक ऊसतोड कामगार आहेत. त्यातील बहुतांश कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. असंघटित व असुरक्षित असलेल्या या वर्गाला सामाजिक प्रवाहासह सुरक्षा, आर्थिक उन्नती साधण्याचे मोठे आव्हान असून, अत्यंत आनंदाने आपण ते स्वीकारत आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये हे महामंडळ स्थापन करण्यात आले होते. विरोधी पक्षात असतानाही मी यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी हे महामंडळ केवळ घोषणेपुरतेच मर्यादीत राहिले होते. परळी येथे या महामंडळाचे नाव दिलेले व कायम बंद राहिलेले कार्यालय चर्चेचा विषय ठरले होते. या महामंडळाला आता मूर्त स्वरूप देऊन ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवू, सुरक्षा व आर्थिक उन्नती साधत ऊसतोड कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, असे धनंजय मुंडे म्हणाले.

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे ऊसतोड कामगारांचे नेते होते. त्यांच्याच मूळ मागणीनुसार हे महामंडळ त्यांच्या नावेच सुरू करण्यात आले होते. ऊसतोड कामगारांना सुरक्षा, आर्थिक उन्नती, मुलाचे शिक्षण यांसह विविध कल्याणकारी योजना तयार करून त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, उद्योग, कामगार व ऊर्जा विभागाकडून या महामंडळाची जबाबदारी आपल्या विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारीला) शासन निर्णय निर्गमित करून स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केलेले धनंजय मुंडे हे या उपेक्षित व असुरक्षित वर्गाला नक्कीच न्याय मिळवून देतील, अशा अपेक्षा ऊसतोड कामगार नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

आमदार अनिल भोसले यांच्या अटकेवर बोलताना मुंडे म्हणाले, कायदा सर्वांना सारखा आहे. आमदार अनिल भोसलेंवर अटकेची कारवाई कायद्याने झाली आहे. मी काल परळी रेल्वे मार्गावर सापडेली बालिका दत्तक घेतली आहे. मानवतेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details