मुंबई : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा दिला जातो. विमा कंपन्यांवर यासाठी 95 कोटींचा खर्च करण्यात येतो. मागील दोन वर्षात राज्य सरकारकडे 1258 प्रस्ताव मंजुरीसाठी आले होते. त्यापैकी 442 प्रस्ताव मंजूर आणि 5 प्रस्ताव विमा कंपन्यांकडे कार्यवाहीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती, कृषी मंत्र्यांनी दिली. तर आतापर्यंत 1508 प्रस्ताव मंजूर केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
दोन लाखांपर्यंत सरकारी मदत :राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना 2016 मध्ये अमलात आणली. अंगावर विज पडून मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, वाहन अपघात, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक लावून शेतकऱ्याचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना दोन लाखांपर्यंत सरकारी मदत दिली जाते. राज्य सरकार यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून विमा कंपन्यांकडे पाठवते. राज्य सरकारच्या अनास्थेमुळे अनेकांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
तक्रारींचा पाढा :बाधित शेतकरी, वारसांकडू अनेक प्रकरणात राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडून सातबारा, सहा-क, सहा - ड, व्हिसेरा अहवाल, पोलिसांचा अंतिम अहवाल आदी मागवल्या जात आहेत. अनेकांनी या बाबींची पूर्तता करून जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर योग्य कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील दोन वर्षात किती शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ मिळाला, किती कुटुंब मदतीसाठी पात्र,अपात्र ठरले याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे.