मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे झालेल्या शपथविधी सोहळ्याच्या हायव्होल्टेज ड्रामामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव होता. हे आता खुद्द पवारांनी मान्य केल्यामुळे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर दुटप्पी खेळ केल्याच्या आरोपाला उत्तर देताना शरद पवार यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली. 2019 च्या सत्तासंघर्षात देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या गुगलीवर त्यांची विकेट गेली, असे शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत जे सांगितले ते खरे आहे. पण पवारांच्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसच बोल़्ड झाले होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील - संजय राऊत, खासदार, ठाकरे गट
वाद कसा सुरू झाला - पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच आमच्यासोबत सरकार स्थापनेसाठी पवारांसोबत बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर पवारांनी माघार घेत डाव पलटवला, असे फडणवीस म्हणाले. त्यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले होते. मी जर निर्णय बदलला होता तर तुम्ही शपथविधी का केला? माझा तर पाठिंबा असता तर ते सरकार दोन दिवसात कोसळले कसे? असा प्रश्न पवारांनी विचारले. तसेच माझ्या गुगलीवर फडणवीसच बोल्ड झाल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवारांनी खरे सांगितले - शरद पवारांच्या पत्रकार परिषदेविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, शरद पवारांनी जे सांगितले ते शंभर टक्के सत्य आहे. त्यावेळी राष्ट्रपती राजवट कधी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. तिन्ही पक्षांचे एक मत होते की बहुमताचा आकडा सिद्ध केला तरीही राज्यपाल बहुमत मानणार नाहीत. आपल्याला झुलवत ठेवतील, बहुमत मान्य करणार नाहीत. मग, एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठविली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला. त्यावेळी पवारांनी एकाचवेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही मारले होते. पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील हे मी आजही म्हणतो. पवारांनी गुगली टाकली नसती तर ती राष्ट्रपती राजवट उठली नसती. वेगळे खोके सरकार निर्माण झाले असते. त्या गुगलीला देवेंद्र फडणवीस यांचा क्लीन बोल्ड झाला.