मुंबई- पीएमसी बँकेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले असतानाच आता वाशीमधील गुडविन ज्वेलर्सकडून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत ग्राहकांच्या तक्रारीनंतर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुडविन ज्वेलर्स विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाशीतील सतरा प्लाझा भागातील गुडविनच्या दुकानाला टाळे लागल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
आज पोलिसांनी पंचासमक्ष गुडविन ज्वेलर्स या दुकानाचे टाळे तोडले. यावेळी फसवला गेलेला गुडविनचा ग्राहकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. भिशी, मुदत ठेवी, हप्त्यावर सोने, यासारख्या योजनांद्वारे गुडविन ज्वेलर्सने कोट्यवधी रुपये गोळा केले. त्यानंतर दुकान अचानक बंद झाल्याने शेकडो गुंतवणूकदार चिंतेत सापडले आहेत. सुमारे २५ हजारांपासून ते २५ लाखांपर्यंत ग्राहकांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.