मुंबई- ऐन दिवाळी सणात चेंबूरच्या गुडविन ज्वेलर्सला कुलूप लागले आहे. दुकानावर स्टॉक क्लिअरचा बोर्ड लागला आहे. मंगळवारपासून कोणतही कारण न देता हे दुकान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, लाखो रुपये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार हवालदिल झाले असून दिवाळी सण अंधारात साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आल्याचे चेंबूर शाखेतील गुंतवणूकदार जॅक्सन लुइस म्हणाले आहे.
राज्यात पीएमसी बँक घोटाळा गाजत असताना आता गुडविन ज्वेलर्सच्या जागोजागी असलेल्या शाखांना कुलूप लागले आहे. यामुळे गुंतवणूकदार मोठ्या विवंचनेत सापडले आहेत. चेंबूर पूर्वेला रोड क्रमांक १८ वर गुडविन ज्वेलर्सची शाखा आहे. या ज्वेलर्समध्ये चेंबूरकरांनी भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून हे दुकान काही दिवसांपूर्वी दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची सूचना दुकानाबाहेर लावली होती. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदारांनी शंका न घेता व्यवहार सुरळीत चालू असावेत, अशी शक्याता व्यक्त केली. मात्र, हे दुकान त्यानंतर मंगळवारपासून बंदच असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.