मुंबई :सध्या सणावाराचे दिवस आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा या सोबतच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान देखील सुरू आहे. यापाठोपाठ आता ख्रिश्चन बांधवांसाठी पवित्र दिवस असलेला गुड फ्रायडे देखील याच आठवड्यात आहे. हा गुड फ्रायडे दिवस म्हणजे नेमका काय? तो का साजरा केला जातो? ख्रिश्चन धर्मात या दिवसाचे महत्त्व काय? त्याच्यामागे नेमका काय इतिहास आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. या सर्वांची माहिती घेण्यासाठी आम्ही ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून या गुड फ्रायडे बद्दल माहिती घेतली.
गुड फ्रायडे म्हणजे काय?: याबाबत बोलताना ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले की, गुड फ्रायडे हा दिवस संपूर्ण जगभरात ख्रिश्चन बांधव साजरा करतात. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभाला बांधण्यात आले होते तो हा दिवस आहे. त्या शुक्रवारला गुड फ्रायडे असे म्हटले जाते. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आले तो दिवस ख्रिश्चन बांधव गुड म्हणून का साजरा करतात त्याला देखील कारण आहे. कारण, संपूर्ण मानव जातीच्या भल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सुळावर चढले. त्यांनी शिक्षा पत्करली आणि संपूर्ण मानव जातीला शांततेचा आणि क्षमा करण्याचा संदेश दिला. म्हणून या दिवसाला ख्रिश्चन बांधव गुड फ्रायडे म्हणतात.
हे बायबलमध्ये आधीच लिहिले होते: तो केवळ शब्द बोलला आणि अखिल मानवजात उदयास आली, अशी ख्रिस्तांमध्ये श्रद्धा आहे. खिस्तांच्या श्रद्धेप्रमाणे अशा परमेश्वराचा पुत्र म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त. तो या पृथ्वीवर केवळ 33 वर्ष राहीला. परंतु आखिल मानवजातीला मानवता आणि शांतीचा संदेश दिला. त्याच्या उपदेशाने लोकांना जीवनाचा खरा मार्ग दिसू लागला. त्यामुळे काही धर्ममार्तंडाच्या पोटात दूखू लागले. बायबलनुसार त्याचा काहीही दोष नसताना आणि त्या काळच्या राजाची इच्छा नसतांना त्याला त्याला वधस्तंभी देण्यात आले. परंतु असे होणार हे बायबलमध्ये लिहले होते.