मुंबई -विदर्भातील अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देणाऱ्या आणि त्यासाठीचा वारसा जपणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने 12-बी दर्जा प्रदान केला आहे. या दर्जामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला शैक्षणिक विकासाचा कार्यक्रम अधिक वेगाने होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्यासाठीच आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यभर दौरा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देण्याबाबत त्यांनी विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला असल्याची माहिती सामंत यांनी दिली.