मुंबई : मुंबई विमानतळावर 1 कोटीं ७५ लाखांचे सोने जप्त करण्यात सीमा विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. दुबईच्या पर्यटनावरून परतलेल्या चार पर्यटकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील वाशी येथे राहणारा ईश्वर रमेश गोरी, सावन भानुशाली, श्याम रमेश गोरी आणि कुणाल वळसे या चौघांना अटक करण्यात आली आहे. आज आरोंपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी किला कोर्टाने आरोपींना 21 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. - विजय अडवाणी, आरोपींचे वकील
चौघांना अटक :विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चार जणांवर संशय आला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेत चौकशी केली. यावेळी या चौघांकडे सोन्याचे दागिने, चेन, बिस्किट असे एकूण दोन किलो सोने आढळून आले. या प्रकरणी नवी मुंबईतील वाशी येथे राहणारा ईश्वर रमेश गोरी, सावन भानुशाली, श्याम रमेश गोरी आणि कुणाल वळसे या चौघांना अटक करण्यात आली आहे.
नायजेरियन महिलेनेही केली होती सोन्याची तस्करी :ग्रीन चॅनलमधून बाहेर पडणाऱ्या एका २५ वर्षीय नायजेरियन महिलेलाही एअर इंटेलिजन्स युनिटने अलीकडेच अटक केली होती. तिच्याकडे अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने सापडले होते. मात्र, त्याची माहिती न देता ती ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत होती. मात्र ती सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तिला बाजूला घेत सखोल चौकशी केली असता तिच्याकडे अडीच किलो वजनाचे १ कोटी ९ लाख रुपयांचे सोने आढळून आले होते.
तस्करांच्या घटनात वाढ : अलीकडे विमानतळावर सोन्याची पावडर, सोन्याची पेस्ट आदी प्रकारांद्वारे झालेली सोन्याची तस्करी अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पकडली जात आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सोने तस्करीचा जुना मार्ग तस्करांनी अवलंबल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतात तस्करीच्या माध्यमातून विविध देशातून सोने आणण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यात मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर (डीआरआय) यंत्रणेने तब्बल 144 किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 76 कोटी रुपये इतकी आहे. यावर्षी सोन्याची पेस्ट, सोन्याची पावडर या माध्यमातून देखील तस्करी झाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या एका तस्करीच्या कारवाईत सोन्याचे बारीक तुकडे करून ते शरीरात लपवून आणण्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा -
- Nuh Violence : नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला अटक, चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता
- Thane Crime News : वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
- Pune Crime : नाचताना पबमध्ये भिरकावला तिरंगा... गायिकेसह आयोजकाविरोधात गुन्हा दाखल