मुंबई Gold Seized by DRI : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटनं मुंबई विमानतळावर कारवाई करत चार किलो सोनं जप्त केलंय. तसंच याप्रकरणी चार जणांना अटक देखील केलीय. जप्त केलेल्या चार किलो सोन्याची किंमत 2 कोटी 58 लाख असल्याची माहिती डीआरआयचे अधिकारी प्रवीण जिंदल यांनी दिली.
संशयितांच्या झाडाझडतीत सापडलं 4 किलो सोनं : डीआरआयनं मुंबई विमानतळावर 2 कोटी लाख रुपयांचं 4 किलो तस्करीचं सोनं जप्त करत 4 जणांना अटक केलीय. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्यांनी 16 जानेवारीला जेद्दाहहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं आलेल्या दोन संशयित प्रवाशांना रोखलं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून या संशयितांची झडती घेण्यात आली. यात मेणाच्या स्वरुपात 1 किलो सोन्याची पावडर लपवलेली आढळून आली. दोन्ही प्रवाश्यांच्या आतील कपड्यांमध्ये (अंतर्वस्त्र) खास शिवलेले होते. यातून त्यांच्याकडून तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलं. तसंच या व्यक्तींच्या सामानाच्या झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांनी नेहमीपेक्षा जड असल्याच्या संशयातून 3 मिक्सर ग्राइंडरची तपासणी केली. मिक्सरचा भाग उघडला असता त्यामध्ये सुमारे 2 किलो सोन्याचे तुकडे लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अशा प्रकारे 2 कोटी 59 लाख रुपयांचे 4 किलो तस्करीचं सोनं जप्त करण्यात आलंय.