पणजी -गोव्यात पुढील काही तासांत विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात सध्या 'महा'वादळ तयार झाले असून लक्षद्वीप आणि मालदीवमध्ये पडणाऱ्या पावसामुळे गोव्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा -माझ्या कार्यकाळात अधिकतर भाजपचीच सत्ता; रघुरामन राजन यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना करून दिली आठवण
31 ऑक्टोबर अखेरीस 1901 ते 2019 या काळात ऑक्टोबर महिन्यात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पणजी वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील काही तासांत विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शिवाय, वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर पेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे. पावसाचा प्रभाव दक्षिण गोव्यात अधिक असण्याची शक्यता असून ढग दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने ताशी 15 ते 20 किलोमीटर वेगाने वाहत आहेत.
2019 च्या ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पाऊस -
पणजी शहरात 1901 ते 2019 याकाळात ऑक्टोबर 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजे 509.1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. यापूर्वी ऑक्टोबर 1925 मध्ये 301.3 मिलीमीटर, 1928 मध्ये 353.6 मिलीमीटर, 1929 मध्ये 356.8 मिलीमीटर, 1974 मध्ये 350.2 मिलीमीटर, 1985 मध्ये 373.5 मिलीमीटर, 2006 मध्ये 391.5 मिलीमीटर तर 2009 मध्ये 383.7 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला.