मुंबई - शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी माझ्यासारख्या एकट्याने काम करून बदल होणार नाही. त्यासाठी माझ्यासारख्या अनेक शिक्षकांना तयार करण्याचा मानस वार्की फाउंडेशनचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवलेले शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना गेल्या आठवड्यात युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टिचर प्राईज) जाहीर झाला. आज सकाळी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची सहकुटुंब भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर बोलताना रणजितसिंह डिसले शिक्षण क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलायचा आहे -
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेली भेट सकारात्मक होती. राज्याचा शैक्षणिक चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. यासाठी ही भेट महत्वाची ठरली. मला काय योगदान देता येईल, यासाठी शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला काही संकल्पना मांडायला सांगितल्या आहेत. मी लवकरच त्यांच्या सुचनेवर काम करणार असल्याचे डिसले यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सत्कार -
डिसले यांचा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब आदी नेते उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील अभिनव उपक्रमांसाठी मिळाला आहे जागतिक पुरस्कार -
'लेट्स क्रॉस द बॉर्डर' या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या देशांतील 50 हजार मुलांची 'पीस आर्मी' तयार करून परस्पर सौदार्ह्याचे वातावरण करण्याच्या शैक्षणिक प्रयोगासाठी डिसले यांची निवड करण्यात आली आहे. डिसले गुरुजींनी तयार केलेली क्यूआर (QR) कोडेड पुस्तके 11 देशांतील 10 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी वापरत आहेत. 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप' या आगळ्या-वेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 पेक्षा अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील 7 वे शिक्षक ठरले आहेत. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफीक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आता त्यांना जगातील सर्वोत्तम शिक्षकांमध्येही स्थान मिळालेले आहे.