मुंबई Global Maritime India Summit 2023: भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठीच्या दीर्घकालीन ब्लू प्रिंटचं अर्थात 'अमृत काल व्हिजन 2047 चं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं हे अनावरण केलं आहे. या ब्लू प्रिंटमध्ये बंदरांमधील सेवासुविधा वाढवण्यासह, शाश्वत पद्धतींना चालना आणि आंतरराष्ट्रीय सहयोग वृद्धी याविषयी अनेक धोरणात्मक उपाययोजनांचा समावेश आहे.
18 हजार कोटींच्या 21 बंदरे प्रकल्पांचं उद्घाटन :गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरण इथं 4 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या टूना टेक्रा ऑल-वेदर डीप ड्राफ्ट टर्मिनलच्या कोनशिलेचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ग्लोबल मेरिटाईम इंडिया समिटमध्ये सहभागी झाले आहेत. आज 23 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं.
मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी विकसित :रेल्वे, समुद्र आणि जलमार्ग यांना एकत्रित करणारी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यावर आमचं लक्ष आहे. पंतप्रधान गतिशक्ती योजनेत लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
सागरी व्यापार वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान :राज्याला लाभलेला 720 किमीचा समुद्रकिनारा, 2 प्रमुख बंदरे, 14 पेक्षा जास्त मोठी आणि मध्यवर्ती बंदरे आणि असंख्य खाड्या लाभल्या आहेत. या सर्व गोष्टींचा भारताच्या सागरी व्यापार वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. 2022-23 मध्ये महाराष्ट्रात मालवाहतुकीच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ झाली असून प्रवासी वाहतूक सेवेसाठी नवीन मार्ग सुरू केले आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बंदरांपैकी आणि टॉप 30 जागतिक बंदरांपैकी एक असून मुंबई पोर्ट एथॉरिटी जगभरातील सर्वोत्तम परंतु सर्वात कमी क्रूझ टॅरिफ देते, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र विकासात नेहमीच अग्रेसर :महाराष्ट्र विकासात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खासगी बंदरांसाठी रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याव्यतिरिक्त, आमचं सागरी धोरण सागरी पर्यटन, जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर उद्योगांना महत्त्वपूर्ण चालना देईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचं स्थान उंचावलं आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचं आवाहन :राज्याचं नवं बंदरे धोरण अतिशय लवचिक आणि विकासाला मोठी संधी देणारं आहे. सागरी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले. आगामी काळात राज्यातील बंदरांवर हायड्रोजन हबची स्थापना, एलएनजी बंकरिंग, यासारख्या सुविधा निर्माण करणार आहोत. त्यामुळे राज्यातील बंदरे विकास एका उंचीवर जाईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- Narendra Modi : आम्ही ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी इच्छुक, २०३६ ऑलिम्पिकसाठी दावा ठोकणार - पंतप्रधान मोदी
- Maratha Reservation Row : मराठा आरक्षण; पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, नाहीतर. . . मनोज जरांगेंनी दिला इशारा