मुंबई - 'तौक्ते चक्रीवादळानंतर आज आठवडा उलटून गेला, तरीही राज्य सरकारने कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी. अन्यथा कोकणवासीय नागरिक म्हणून मी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार आहे', असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तसेच भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शिवसेनेची सामाजिक बांधिलकी कुठे आहे?', असा सवालही दरेकरांनी केला आहे.
'कोकणवासीयांना लवकर मदत द्या, अन्यथा...', प्रवीण दरेकरांचा सरकाला इशारा 'आज शिवसेना कुठे आहे?'
'सामाजिक बांधिलकी हा शिवसेनेचा प्राणवायू होता. आज शिवसेनेचा प्राणवायू कुठे आहे? हे राऊतांनी पाहावे. निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा शिवसेना कुठे होती? आज शिवसेना कुठे आहे? परवा तौक्ते चक्रीवादळात शिवसेना कुठे होती? यापूर्वी कोकण संकटात असताना शिवसेना शाखाप्रमुख तत्काळ कोकणवासीयांच्या मदतीला धावून जात होते. पण आज शिवसेनेने सामाजिक बांधिलकी हरवलेली आहे. यामुळे संजय राऊत यांनी त्याची चिंता करावी', असे दरेकरांनी म्हटले आहे.
'...तर मंत्रालयासमोर उपोषण करणार'
'मुख्यमंत्र्यांनी तीन तासांचा रत्नागिरी दौरा केला. आता त्या गोष्टीला तीन दिवस झाले. पंचनामे पूर्ण झाले असतील किंवा नसतील; तरीही राज्य सरकारने कोकणवासीयांना मदत जाहीर करावी, अन्यथा पुढील काही दिवसांत मी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण करेल', असा इशारा आज (24 मे) प्रवीण दरेकर यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रथमदर्शी अहवाल तयार आहे. त्याचा हवाला सरकारने घ्यावा, अशीही मागणी दरेकरांनी केली.
'महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका हास्यास्पद'
'महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका संशयास्पद आहे. काँग्रेस सरकारला सांगणार आहे का? कोकणवासीयांना दोन दिवसात मदत द्या, अन्यथा आम्ही सरकारमधून बाहेर पडू, अशी काँग्रेसची भूमिका म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नाणार प्रकल्प व्हावा, अशी मागणी केली आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका हास्यास्पद आहे. सत्तेतला प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना सत्तेत आहे. याविषयी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी. त्यामुळे सत्तेतील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. यांना सत्तेत राहायचे आहे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवायचे आहे', अशी टीकाही दरेकरांनी केली आहे.
हेही वाचा -मुंबईतील स्मशानभूमींवर कोरोना मृतदेहांचा ताण नाही