मुंबई- राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता. त्यानंतर महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना, मंदिरे उघडण्यास मात्र अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील माझ्यावर महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबादारी असल्याची सांगत मंदिर उघडण्यास नकार दिला. त्यावर राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांवर हिंदूत्ववादी ते सेक्यूलर असा निशाणा साधत मंदिरे खुली करण्यासाठी पत्र लिहले. त्यानंतर भाजपाच्या इतर नेत्यांप्रमाणे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
'स्वतःला हिंदुत्ववादी व रामभक्त म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्या पासून सुरू होणाऱ्या रामलीला उत्सवाकरिता महाराष्ट्रात परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात बार, रेस्टॉरंट, मॉल आणि आता मेट्रोला सुद्धा परवानगी दिली असताना राज्यातील मंदिरे अद्याप बंद आहेत, किमान संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या व करोडो नागरिकांच्या भावनेचा व श्रद्धेचा विषय असलेल्या रामलीला उत्सवाला आवश्यक नियमांसह परवानगी द्यावी अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हिंदूत्वाच्या भूमीकेवरून निशाणा साधला आहे.