मुंबई- गेल्या काही दिवसामध्ये सांगली व कोल्हापूर प्रमाणे कोकणामध्येही मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे येथे नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष लावण्याची मागणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपरिषदेत केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यास मान्यता दर्शवली असल्याची माहिती केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकणातील घरांची रचना वेगळ्या प्रकारची आहे. पूर अथवा अतिवृष्टीनंतर काही काळाने घरांची पडझड होते. त्यामुळे नुकसान भरपाई नाकारली जाते. त्यासाठी पूर अथवा अतिवृष्टी झालेल्या भागामधील घरांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी. पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली जनावरे मिळाली नसली तरीही शेतकरी अथवा इतर यंत्रणांकडून माहिती घेऊन संबंधितांना भरपाई देण्यात यावी. काजू, आंबा, नारळ, फणस, कोकण, जांभूळ या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई देताना प्रत्येक झाडांची किंमत ठरवावी आणि त्या प्रमाणात अथवा झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम भरपाई म्हणून देण्याची मागणी केसरकर यांनी केली आहे.