मुंबई -एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन सतत रखडत असल्याने महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाची मालमत्ता ताब्यात घेऊन एसटी कामगारांना शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतन श्रेणी, सर्व सेवा-शर्ती लागू करण्याची मागणी संघर्ष एसटी कामगार युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एसटी कामगारांचे भविष्य अंधारमय
संघर्ष एसटी कामगार युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवासी बस वाहतूक सेवा नागरिकांना पुरविण्यात येते. गेली वर्षानुवर्षे हे सेवाव्रत अखंड व अविरत सुरू आहे. ही सेवा महाराष्ट्रातील नागरिकांची जीवनवाहिनी आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात सार्वजनिक प्रवासी बस वाहतूकीच्या खासगीकरणाच्या राजकीय व शासकीय धोरणातून खासगी वाहतूकदारांना मुक्तद्वार देण्यात आहे. त्यांचा कर्तव्यभाव केवळ नफा कमविण्याचा असल्याने केवळ नफा होणाऱ्या मार्गांवर प्रवासी वाहतूक देण्यात येऊन, खेड्यापाड्यात गोरगरीबाच्या दाराशी सेवा देणाऱ्या या जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक विपन्नावस्थेत ढकलण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर वेतन वेळेवर न मिळण्याची आणि भविष्य अंधारमय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.