मुंबई - कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 'बेस्ट' सेवा देत होती. मात्र, आता कोरोनाबाधित रुग्णांना वाहून नेण्यासाठीही बेस्टचा वापर केला जातोय. जे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने बेस्ट कर्मचाऱ्यांची आरोग्याची जबाबदारी घ्यावी. तसेच त्यांना 1 कोटी रुपयांचा विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितिन भाऊराव पाटील यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे, हे माहीत असूनही बेस्ट प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेताना दिसत नसल्याचा आरोपही नितीन पाटील यांनी केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोरोना रुग्ण वाहून नेण्याची जबाबदारी बेस्ट टाकत असेल तर त्यांच्या दैनंदिन गरजेपासून ते त्यांच्या शारीरिक स्वच्छतेपर्यंत, त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व जबाबदारी बेस्ट प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.