मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकीय मधून गुजरात आणि महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या मुलींबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, 'गेल्या 5 वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली गायब झाल्या आहेत. हा आरोप विरोधकांनी केलेला नसून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातूनही मुली बेपत्ता : जगाच्या पटलावर गुजरातसारखे दुसरे राज्य नाही, असे सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिले आहे. गुजरात हे देशाच्या विकासाचे एकमेव मॉडेल असल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र या एका अहवालाने गुजरातचा पर्दाफाश केला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे, असे 'सामना'त म्हटले आहे. एकीकडे 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून देशातील वातावरण तापले असताना आता महाराष्ट्र राज्यातूनही गेल्या 3 महिन्यांत तब्बल 5 हजार 610 तरुणी बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे हा आकडा वाढताच असून मार्चमध्ये सर्वाधिक 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. एकूणच राज्यातून दिवसाला सरासरी तब्बल 70 मुली बेपत्ता होत आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे ट्विट : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून 1 हजार 600 मुली बेपत्ता झाल्या, तर फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 810 मुली बेपत्ता झाल्या. तसेच मार्चमध्ये 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे.
कशामुळे मुली होतात बेपत्ता-इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली गायब होण्याचे प्रमाण असून त्या मागचे काही कारणे आपण जाणून घेऊया. मुली, महिला बेपत्ता होण्यामागे पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घरातून निघून जाणे ही काही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. यामध्ये ५० टक्के महिला परत आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, शरीरविक्रयाशी (सेक्स स्लेव्ह) संबंधित मानवी तस्करी, शोषणाच्या घटनांचे धोके व्यक्त होताना दिसतात. अशा घटनांचा मागोवा घेण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.