मुंबई : तृतीयपंथीयांच्या आरोग्य विषयक समस्या आपल्या सारख्याच आहेत. पण त्याच आजारांसाठी त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक मात्र वेगळी मिळते. त्यामुळे आजारांच्या उपचारासाठी ही आपलीच भावंडे आपल्या शासकीय रुग्णालयात भरती होणे टाळतात. समजा चुकून भरती झाले तरी इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नाराज होतात. तक्रार करतात व त्यामुळे ते आजारपणातही रुग्णालयात जाणे टाळतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासन सुद्धा संभ्रमित होते. म्हणूनच त्यांच्या भावना समजून घेऊन तृतीयपंथीय रुग्णांसाठी देशातील पहिला ३० बेड चा वॉर्ड मुंबईतील जीटी रुग्णालयात सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज या वार्डच उद्घाटन करण्यात आले.
कशा पद्धतीने उपचार : जीटी रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मानक मार्गदर्शक प्रणाली बनवली. जेणेकरून एखादी तृतीयपंथी व्यक्ती उपचार घेण्यासाठी आल्यास त्यांना कसे समजून आणि सामावून घ्यायचे हे कर्मचारी व अधिकारी यांना वेळोवेळी उपयुक्त ठरेल. तसेच त्यांना आवश्यक ती रुग्णसेवा उपलब्ध होईल याची दक्षता घेतली जाईल. केस रेकॉर्ड फॉर्म मध्ये श्री, पुरुष आणि इतर असा विकल्प ठेवण्यात येणार आहे. तसेच, जन्मजात लिंग, सध्याची लैंगिक ओळख आपण कश्याप्रकारे ओळखले / संबोधले जावे. (तो / ती / ते) याची नोंद केली जाईल. व रुग्णांवर आवश्यक ते उपचार केले जातील.
देशातील पहिला ३० बेड चा वॉर्ड :ज्या तृतीयपंथीय व्यक्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले कार्ड नसेल तर त्यांनी स्वतः नमुना फॉर्म भरून नोंदणी विभागात किंवा अपघात विभागात माहिती द्यायची आहे. ज्या रुग्णांना भरती करण्याची गरज आहे, त्यांना टीजी वॉर्डमध्ये भरती करण्यात येईल. भरती होताना काही रक्त चाचण्या व मानसिक आरोग्य या विषयी माहिती घेतली जाईल. महात्मा फुले / प्रधान मंत्री योजने अंतर्गत नमुद केलेल्या आजारांवर उपचार केले जातील. तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली जाईल. वॉर्डमध्ये ३० खाटा असून विविध वैद्यकीय अनेक प्रकारच्या वैद्यकीय सेवा कक्षात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच समुपदेशक, मानसोपचार तज्ञ यांच्याकडून नियमित भेटी होतील.