महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकल अपघातात हात गमावलेल्या मोनिकावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

2014मध्ये घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडताना अपघात होऊन मोनिका मोरे या तरूणीला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. मोनिकावर ग्लोबल रुग्णालयात हात प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

By

Published : Aug 30, 2020, 12:05 PM IST

Updated : Aug 30, 2020, 5:17 PM IST

Monika More
मोनिका मोरे

मुंबई -लोकलमधून पडून दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला आता खरेखुरे हात मिळाले आहेत. मोनिकावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून तिची प्रकृती सुधारत आहे. सध्या तिला आयसीयूमध्ये ठेवले असून तिला पूर्णतः बरे होण्यास अर्थात हाताने सर्व कामे करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागले. तीच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी ही माहिती दिली. पुढील सहा महिन्यांपासून तिच्यावर फिजिओथेरपी सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोनिकाला पूर्णतः स्वावलंबी होण्यासाठी लागणार आणखी दीड वर्ष

2014मध्ये घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल पकडताना मोनिका पडली होती. या अपघातात तिचे दोन्ही हात गेले होते. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मात्र, या हातांनी तिला म्हणावी तशी कामे करता येत नव्हती व ती पूर्णतः स्वावलंबी होऊ शकली नव्हती. त्यामुळे तिच्यावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यासाठी नोंदणी करुन हात मिळवण्यासाठी शोध सुरू केला. 26 ऑगस्टला त्यांचा शोध संपला. चेन्नईमधील 32 वर्षीय ब्रेन डेड तरुणाच्या कुटुंबाने मोनिकाला हात दिले. हे हात 27 ऑगस्टला रात्री मुंबईत आणण्यात आले आणि तब्बल 15 तास शस्त्रक्रिया करून 12 डॉक्टरांच्या टीमने मोनिकाच्या हाताचे प्रत्यारोपण केले.

डॉ. सातभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार आता मोनिका ठीक आहे. मात्र, तिला पूर्णतः स्वावलंबी होण्यासाठी दीड वर्ष लागेल. दरम्यान, मोनिकाचे मामा विश्वास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता मोनिका बरी असून ती खूप आनंदी असल्याचे सांगितले. आता ती खऱ्या अर्थाने स्वावलंबी होणार असल्याने तिचे संपूर्ण कुटुंब खुश आहे. त्यांनी डॉक्टरांसह मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Last Updated : Aug 30, 2020, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details