महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपरचा 'तो' पूल हलक्या वाहनांसाठी खुला - धोकादायक पूल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पूल पावसाळ्याच्या तोंडावर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले . त्यामुळे मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे.

घाटकोपरचा धोकादायक पूल हलक्या वाहनांसाठी खुला

By

Published : Jul 28, 2019, 6:00 PM IST

Updated : Jul 28, 2019, 8:47 PM IST

मुंबई-घाटकोपर बेस्ट आगार जवळील लक्ष्मीनगर नाल्यावरील पालिकेने बंद केलेला धोकादायक पूल हलक्या वाहनांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामुळे लहान वाहन चालकांना पूर्व-पश्चिम दिशेला वेळेत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेट लांबच्या फेऱ्यापासून सुटका होणार आहे.

घाटकोपरचा धोकादायक पूल हलक्या वाहनांसाठी खुला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पूल पावसाळ्याच्या तोंडावर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीला देखील सामोरे जावे लागत आहे. अशातच पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व येथील घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावरील लक्ष्मी नगर नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे पालिकेने ३१ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला. या रस्त्यावरून पूर्व-पश्चिम भागात जाण्यासाठी रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

यादरम्यान अचानक पूल बंद केल्याने आणि 2 ते 3 किलो मीटरचा लांबचा फेरा पडत असल्याने स्थानिक नागरिकांत मोठ्या प्रमाणात नाराजी होती. पूल किमान 4 महिने बंद ठेवण्यापेक्षा हलक्या वाहनांसाठी तरी चालू करावा, ही मागणी करण्यात येत होती. त्यामुळे शनिवारी सकाळपासून या मार्गावर हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने या पुलावर लोखंडी गज टाकून त्यावर लोखंडी प्लेटच्या सहाय्याने सुरक्षित रस्ता तयार केला आहे.

घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे. तसाच तो पश्चिम द्रुतगती मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी देखील जोडतो. त्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. परंतू हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आणि स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी या मार्गाचे उद्घाटन केले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाल्याचा मोठा दिलासा पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहनचालकांना मिळाला आहे.

Last Updated : Jul 28, 2019, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details