मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून अपमान झाल्याच्या निषेधार्थ सर्वसामान्य जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाची माहिती करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडून वीर सावरकर गौरव यात्रा राज्यभरात काढली आहे. मात्र, आता या वीर सावरकर गौरव यात्रेला शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटही सरसावला आहे. ठाकरे गटाकडून आता घर घर सावरकर ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
घर घर सावरकर मोहीम? :भाजपा आणि शिवसेनेकडून 30 मार्चपासून येत्या सहा एप्रिलपर्यंत राज्यभरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये गौरव यात्रा काढली जात आहे. राज्यातील जनतेकडून या यात्रेला प्रतिसाद मिळत असताना आता ठाकरे गटानेही सावरकर यांच्या विषयी आपल्याला असलेले ममत्त्व दाखवण्यासाठी घर घर सावरकर मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र. यामध्ये यात्रा काढण्याचा विचार नाही असही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात विर सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर त्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात उलट-सुलट चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता ठाकरे गटाने हा विषय हाती घेत घर घर सावरकर ही मोही सुरू करण्याचे जाहीर केली आहे.