मुंबई -मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपाने मिशन मुंबईची घोषणा केली आहे. काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार सुरू केला आहे. त्याचवेळी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिेले आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेला भाजपा शिवसेनेचा वैरी बनला आहे. भाजपाने मिशन मुंबईची घोषणा करताच शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगला येथे बैठक घेतली. या बैठकीत पालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. विरोधक काय बोलतात त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्वतःची काळजी घेत काम करा -
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश - मुंबई महापालिका निवडणुक बातमी
कोणतेही संकट येवो, स्वतःची काळजी घेत जनतेची कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
यावेळी कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले. कोरोनाच्या काळात नागरी कामे करता आली नाहीत. पण आता कोणतेही संकट येवो, स्वतःची काळजी घेत जनतेची कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
भाजपा विरोधी बाकावर -
मुंबई महापालिकेत पंचवीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. भाजपाने या काळात मित्रपक्षाची भूमिका पार पाडली. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता येताच भाजपाने मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्याचा निर्धार केला. मात्र, २०१७ मध्ये पुन्हा पालिकेत शिवसेनेचा महापौर बनला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यामुळे भाजपाने राज्यात आणि मुंबई महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला आहे.