मुंबई Oliver Kahn : जर्मनीचे दिग्गज फुटबॉलपटू ऑलिव्हर कान यांनी भारतातील फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी फुटबॉल अकादमी सुरू केली आहे. या निमित्तानं ते शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) मुंबईतील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी, "भारत लवकरच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळेलं", असा विश्वास व्यक्त केला. "भारतातील युवा खेळाडूंमध्ये फुटबॉल प्रति भरपूर आत्मीयता आणि प्रेम आहे. त्या प्रेमाला योग्य दिशा आणि प्रशिक्षण दिलं तर भारत फुटबॉलमध्ये नवीन उंची गाठेल", असं ते म्हणाले.
अकादमीच्या माध्यमातून फुटबॉलचे धडे: क्रिकेटवेडा भारत अजूनही फुटबॉलच्या बाबतीत खूप मागे आहे. भारतात फुटबॉलचे करोडो चाहते आहेत. मात्र खेळाडूंना योग्य दिशा आणि प्रशिक्षण मिळत नसल्यानं ते भरकटतात. फिफा वर्ल्डकप आला की भारतात फुटबॉल बद्दल बोललं जातं, त्याचा विचार केला जातो. मात्र एकदा वर्ल्डकप संपला, की हा विचार फक्त विचारच राहतो. फिफा वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याचं भारताचं स्वप्न आहे. आता हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ऑलिव्हर कान यांनी कंबर कसली आहे.
भारतात फुटबॉलपटू घडवण्यात मदत : ऑलिव्हर कान यांनी भारतात फुटबॉलपटू घडवण्यासाठी अकादमी सुरू केलीये. या अकादमीच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलपटूंना खेळाचे विशेष धडे दिले जातील. यामुळे भारतीय फुटबॉल प्रगतीपथावर नेण्यास मोठी मदत होणार आहे. याद्वारे केवल फुटबॉलपटूच नाही, तर एकूण अॅथ्लीट घडवण्यामध्ये देखील फार मोठी मदत होईल. भविष्यात ही अकादमी संपूर्ण भारतात सुरू करण्याचा ऑलिव्हर कान यांचा मानस आहे.