मुंबई - उद्योगपती गौतम अदानी रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी पोहोचले. या दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित होत्या. विशेष म्हणजे शनिवारी बारामतीमध्ये शरद पवार यांनी गौतम अदानी यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री या दोघांची भेट झाली असल्याकारणानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
गौतम अदानी यांची राष्ट्रवादी अध्यक्षांकडून वेळोवेळी पाठराखण-एकीकडं धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तसेच काँग्रेसकडून अदानी यांना टार्गेट केले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शरद पवार वारंवार गौतम अदानी यांची पाठराखण करताना दिसत आहेत. त्यामुळे शरद पवार व गौतम अदानी यांच्या संबंधांवरून महाविकास आघाडीत अंतर्गत कुजबुज सुरू झाली आहे. या अगोदरसुद्धा सप्टेंबर महिन्यात शरद पवार आणि गौतम अदानी यांची भेट झाली होती. पण गुरुवारी रात्री अचानक अदानींनी पवारांची भेट घेतल्यानंतर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता-यापूर्वी अनेकदा शरद पवार यांनी उघडपणे गौतम अदानी यांचं कौतुक केलं होतं. देशातील उद्योग विकासामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचं नेहमीच योगदान असल्याचं पवारांनी अनेकदा म्हटले आहे. तसेच गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीलासुद्धा शरद पवार यांनी विरोध केला होता. गौतम अदानी यांच्यासोबत शरद पवार यांची वाढत असलेली जवळीक बघता येणाऱ्या दिवसांत यावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे.
धारावीच्या पुनर्विकासावरून महाविकास आघाडीत मतभेद-आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट हे उद्योगपती गौतम अदानी यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी उद्धव ठाकरे गटानं अदानी यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चाला काँग्रेसनेसुद्धा साथ दिली. परंतु शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या मोर्चापासून दोन हात लांबच राहिली. या मोर्चा दरम्यान केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी तसेच भाजपावर सडकून टीका केली. गरज पडल्यास मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणं ज्यांनी कोणी धारावीची सुपारी घेतलीय त्यांनी लक्षात घ्यावे की हा अडकित्ता आहे. त्यानं ठेचलं तर परत कधीच नाव घेणार नाही, असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला. त्याचप्रमाणे जे व्यवसाय गुजरातला गेले आहेत ते धारावीत परत आणा अशी मागणीही ठाकरेंनी केली होती.
हेही वाचा-
- Atul Londhe News: शरद पवार आणि गौतम अदानी भेटीचा काहीही फरक पडणार नाही, चौकशीसाठी कॉंग्रेसची भूमिका ठाम- अतुल लोंढे
- Gautam Adani meet Sharad Pawar : गौतम अदानींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकमध्ये घेतली भेट, दोन तास झाली चर्चा