मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स संबंधात आज (सोमवार) ईडीने गोव्याचे उद्योजक गौरव आर्य यांची चौकशी केली. गौरव आर्य यांचे नाव रियाशी केलेल्या ड्रग्जविषयी व्हॉट्सअॅप चॅटवर आले होते. यामुळे ईडीने आर्य यांची तब्बल ६ तास चौकशी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल झवेरी आणि गौरव आर्य यांनी गोव्यातील बर्याच ठिकाणी एकत्र गुंतवणूक केली आहे. त्या ठिकाणांची नावे आणि किती गुंतवणूक केली गेली आहे, याचा शोध घेण्याचा ईडी प्रयत्न करत आहे. कपिल झवेरी गोव्यातील ड्रग्ज प्रकरणात अडकले आहेत.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सलग तीन दिवस रिया चक्रवर्तीची सीबीआयने चौकशी केली. यानंतर आता सुशांतसिंह राजपूत याची बहिण मितू सिंह हिला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयचे पथक थांबले असून या ठिकाणी मितू सिंहची चौकशी करण्यात येणार आहे. तर रविवारी ९ तास चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीची पुन्हा सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. आज (सोमवारी) मितू सिंह चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर झाली आहे.