मुंबई - गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या पावसाने आज सातव्या दिवशी जरा विश्रांती घेतलेली आहे. यामुळे सात दिवस विराजमान झालेल्या गणपतींचे विसर्जन उत्साहात पार पडणार असल्यामुळे मुंबईकर गणेशभक्त आनंदी आहेत. दीड दिवस व पाच दिवसांच्या गणपतींना विसर्जनाच्यावेळी पडलेल्या पावसामुळे उत्साहात निरोप देता आला नाही. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुढील विसर्जन वाजत-गाजत करता येणार आहे.
काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊसाची बॅटींग सुरू आहे. मात्र, आज पावसाने उघडीप दिली असून यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गणेश दर्शनासाठी निघालेले आहेत. हवामान खात्याने रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर सकाळी काही भागात जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र, दुपारी बारानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गणेश भक्तांना त्यांच्या लाडक्या बाप्पाला मनाप्रमाणे निरोप देता येणार असल्याने भाविकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.