मुंबई - मुंबईच्या फोर्ट परिसरातील व्यावसायिकाला गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गॅंगस्टर सुरेश पुजारी ( Gangster Suresh Pujari Arrested ) याला अटक केली. या प्रकरणातील हे सातवी अटक असून गुन्हे शाखेने यापूर्वी सुरेश पुजारी टोळीच्या दोन हस्तकासह तीन शूटर्स आणि एका अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात सुरेश पुजारी यांची मुंबई गुन्हे शाखेने पुन्हा कोठडी मागितली. ( Gangster Suresh Pujari Police Custody ) न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करून देण्यात आली आहे.
सुरेश पुजारीवर 51 गुन्हे दाखल -
गॅंगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई अशा ठिकाणी एकूण 51 गुन्हे दाखल आहे. यातील 17 गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल असून 10 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा करत आहे. यात मोक्का कायद्यान्वये 6, खुनाच्या प्रयत्नात 3 आणि खंडणीच्या 4 गुन्ह्यांचा समावेश आहे. तर ठाणे पोलिसांकडे 30 राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडे 2, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर पोलिसांकडे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखेने या प्रकरणात मोक्का कायद्यान्वये कारवाई करत विशेष मोक्का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सुरेश पुजारीला पहिल्या क्रमांकाचा आरोपी दाखवण्यात आले होते. खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या पथकाने सुरेश पुजारीचा ताबा एटीएसकडून घेतल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक केली. न्यायालयाच्या मागील सुनावणीनंतर त्याची 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता पुन्हा 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.