मुंबईGaneshotsav 2023:मुंबईत वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय. गणराया विराजमान होऊन आठ दिवस होत आहेत. त्यातच दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन समुद्रात केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी आपण समुद्रकिनारी जात असाल, तर आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेण्याबाबत आवाहन करण्यात आलंय. उद्या दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. तर दुसरीकडे समुद्रातील 'स्टिंग रे' आणि 'जेलीफिश' यांची भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळं भाविकांनी सावधानता बाळगावी. महापालिकेकडून खबरदारी म्हणून उपाय योजनेबाबत पाऊलं उचललेली आहे.
'अशी' घ्या काळजी : बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करताना आपण समुद्रकिनाऱ्यावर जातो. अनेकदा आपल्याला स्टिंग रे चावतो, पण आपल्याला ते ओळखता येत नाही. 'स्टिंग रे'नं दंश केला तर आपल्याला चटका लागल्यासारखं जाणवतं. त्यासोबत मोठ्या प्रमाणात खाज सुटतं. स्टिंग रे आणि जेलीफिष दंश केल्यानं घाबरून जाऊ नये, तात्काळ प्रथम उपचार घ्यावे. जखम स्वच्छ पाण्यानं धुवून टाकावी. त्यावर आपण बर्फ देखील लावू शकतो. चौपाटी परिसरामध्ये यावर उपाययोजना म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आलीय. वैद्यकीय मदत कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आलाय, अशी माहिती डॉक्टर अल्फीया रिझबी यांनी दिलीय.
विविध सुविधांची व्यवस्था : गणपती विसर्जन सोहळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालिका देखील सज्ज झालीय, असं प्रशासनानं सांगितलं आहे. यावर्षी पालिकेचे 10 हजार कर्मचारी, जीवरक्षक 71 नियंत्रण कक्ष तसेच प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, प्रसाधन केंद्र आणि विविध सुविधांची व्यवस्था केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय. तर, या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यावर्षी 69 नैसर्गिक जलाशयांची निवड केलीय. 191 कृत्रिम तलाव तयार केले आहेत.