मुंबई :Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी (Ganesh chaturthi 2023 ) आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने, याची तयारी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आहे. मुंबईतील विविध चित्र शाळांमध्ये विशेष करून लालबाग, चिंचपोकळी,परळ, करिरोड या परिसरात आज दिवसभर जल्लोषाचे वातावरण असणार आहे. मुंबईतील पन्नास पेक्षा जास्त भव्य दिव्य गणेश मूर्तीचं आज आगमन होणार असून यासाठी हजारो भक्तांची गर्दी लोटणार आहे.
गणपतीचं वाजत गाजत आगमन: ( Ganesh Festival 2023 ) यंदा गणेश मूर्तीवरील उंचीची बंधन सुद्धा हटवल्याकारणाने महिन्याभरापासूनच मंडळांनी फार मोठ्या प्रमाणात याची तयारी सुरू केली आहे. १९ सप्टेंबरला गणेशोत्सवाला जरी सुरुवात होणार असली तरी, मुंबईतील मोठ मोठ्या मंडळांनी त्यांच्या मंडपात गणरायाचे आगमन (Mumbai Ganeshotsav) अगोदरच करायला सुरुवात केली आहे. शनिवारच्या दिवशी मुंबई परळचा महाराजा, बिल्लीमोराचा चिंतामणी, मुंबईचा युवराज, कुलाब्याचा राजा, कोल्हापूरचा सम्राट, हनुमान सेना मंडळाचा हैदराबाद, सहारचा महाराजा, कोल्हापूरचा चिंतामणी, मुंबईचा पेशवा या गणेश मंडळाच्या गणपतीचं वाजत गाजत धुमधडाक्यात आगमन झालं.
या बाप्पांचे आज होणार आगमन :आज रविवार सुट्टीच्या दिवशी आगमन होणाऱ्या गणपती मध्ये मालाडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, अखिल चंदनवाडीचा राजा, मुंबादेवीचा गणराज, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, भोईवाड्याचा महाराजा, गौरी पाड्याचा गौरीनंदन, साकीनाक्याचा महाराजा, नटराज मार्केटचा राजा, धारावीचा वरद विनायक, स्लेटर रोडचा राजा, मलबार हिलचा राजा, मुंबईचा महाराजा, खेतवाडीचा राजा, दुसरी खत्तर गल्लीचा मोरया, लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर, मुंबईचा मोरया, पंचशीलचा विघ्नहर्ता, भोईवाड्याचा महाराजा, गौरीपाडाचा गौरीनंदन, नटराज मार्केटचा राजा, कुलाब्याचा सम्राट, कोल्हापूरचा गणाधीश या व इतर बाप्पांचे आगमन आज होणार आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त :मुंबईत असंख्य मंडळाच्या गणरायांचे आगमन होणार असल्याने, मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. आगमनाची मिरवणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी लालबाग, परळ, करीरोड या भागातील गणेश चित्रशाळेत त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यावरील गर्दीनुसार वाहतूक थांबवणे व अन्यत्र वळवणे हा निर्णय त्यादरम्यान घेतला जाणार आहे. तसेच आगमन मिरवणुकीसाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. तर भव्य दिव्य अशा गणरायाच्या मुर्त्यांचे आगमन होताना तो क्षण आपल्या कॅमेरा, मोबाईलमध्ये टिपण्यासाठी हजारो भाविक मुंबईतील रस्त्यावर गर्दी करत असतात.