मुंबई Ganeshotsav 2023 : मुंबईत पाच दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. हा विसर्जन सोहळा रविवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. यंदाच्या गणेशोत्सवात पाच दिवसांच्या एकूण 29 हजार 792 घरगुती मूर्ती तर 597 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल 18 हजार 206 घरगुती गणपतीची संख्या वाढल्याची माहिती पालिकेनं दिलीय. या गणपतींचं विसर्जन मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आलंय. या विसर्जनानंतर आता समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेच आव्हान पालिकेसमोर आहे.
मुंबईतील समुद्रकिनारे करणार स्वच्छ : भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छतेची मोहीम हाती घेतलीय. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, या स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे कर्मचारी, कामगार, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. या मोहिमेत श्रमदान करत निर्माल्यासह प्लास्टिक तसंच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा गोळा करून मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ केले जाणार आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे स्वच्छ मुंबई संकल्पना अधिक व्यापकतेने राबवण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पालिकेने गणेशोत्सव काळात विशेष मोहीमही राबवण्यात आली होती.