मुंबई : मुंबईत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. मार्केटमधील गर्दी पाहिल्यास कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे.
दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी दादर मार्केटमध्ये गर्दी -
मुंबईत सुमारे दोन लाखाहून अधिक घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तीचे पूजन केले जाते. गणेशोत्सव साजरा करताना सजावट, फुलांची आरास केली जाते. फुले, हार, सजावटीचे साहित्य आदीच्या खरेदीला भाविक दादर येथील मार्केटमध्ये येतात. उद्यापासून गणेशोत्सव (10 सप्टेंबर) साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून दादरच्या मार्केटमध्ये भाविकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचे निर्बंध लागू असताना महापालिका व पोलीस प्रशासनाने या गर्दीकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गर्दी टाळण्याचे आवाहन -
देशभरात सण साजरे करताना होणाऱ्या गर्दीमधून कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सणांमध्ये होणाऱ्या गर्दीवर निर्बंध आणावेत, अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
गर्दी टाळा, कोरोनाला घाला आळा -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या दीड वर्षात मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. केरळ आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्याने केंद्र सरकारने सणांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध लादण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने सर्व सण गर्दी न करता साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमावली जाहीर केली आहे.
हेही वाचा -गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, पहा काय आहेत नियम
हेही वाचा -यंदाही गणेशोत्सवाला ढोलताशाचा गजर नाहीच, कोरोना प्रतिबंधंक निर्बंधामुळे वाद्य प्रेमींच्या आनंदावर विरजण