मुंबई- सात दिवसाच्या गणपतीचे काल (रविवार) भक्तिमय वातावरणात महानगरातील विविध भागात विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार अशा जयघोषाने शिवाजी तलाव परिसर दणाणून निघाला. विसर्जन एलबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम येथील शिवाजी तलावात करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठी गर्दी होती.
गणेश चतुर्थीपासून धार्मिक रूढी परंपरेनुसार दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. यानंतर पाच दिवसाच्या, सहा दिवसाच्या, सात दिवसाच्या आणि दहा दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन मोठया भक्तिमय वातावरणात केले जाते . बहुतांश गणेश बाप्पाचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते. काल गणेश स्थापनेनंतरचा सातवा दिवस असल्याने गणेश भक्त मोठ्या प्रमाणात कुर्ला येथील शिवाजी तलावाकडे साकीनाका, सुंदरबाग, घाटकोपर, असल्फा, विद्याविहार, नारायण नगर, सह्याद्री नगर, टिळक नगर येथून आपल्या लाडक्या बाप्पाला गाडीत व इतर वाहनात बसवून वाजत गाजत जयजयकार करत तलावाकडे येत आहेत.