मुंबई Ganesh Festival २०२३ : पर्यावरण पूरक गणेशमूर्ती समजाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीनं गणेशमूर्तीवर शिक्का मारण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र हा गणेश भक्तांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे गणेशोत्सवात ( Ganesh Festival) देण्यात येणाऱ्या मूर्तींवर कोणताही शिक्का मारण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या या आदेशानं महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरु आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली :मुंबई महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा, यासाठी महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र त्यांच्या या निर्णयावर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आक्षेप घेतला. गणेशोत्सव हा लाखो हिंदूंच्या आस्थेचा विषय असल्यानं या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्राद्वारे कळवलं आहे.