मुंबई- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांच्या पार्थिवावर दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत मंगळवारी 5 वाजता बौद्ध धम्मातील पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे सोमवारी विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले होते.
पँथर राजा ढाले अनंतात विलीन; अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
राजा ढाले यांचे दलित चळवळ व साहित्य क्षेत्रात मोठे नाव होते. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
राजा ढाले यांचे दलित चळवळ व साहित्य क्षेत्रात मोठे नाव होते. राजा ढालेंचे सामाजिक व साहित्य क्षेत्रातील योगदान न विसरण्यासारखे आहे. दादर येथील चैत्यभूमी समशानभूमीच्या परिसरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्युत दाहिनीत ठेवण्यात आले. उपस्थितांनी राजा ढाले यांना साश्रूनयनाने निरोप दिला.
राजा ढाले यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची मुलगी गाथा ढाले, पत्नी दीक्षा ढाले, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आमदार जोगेंद्र कवाडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अविनाश महातेकर उपस्थित होते.