मुंबई -कोराेनामुळे जनतेचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच वाढणाऱ्या इंधनाच्या (डिझेल) दरामुळे देशभरातील मालवाहतूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. आता सततच्या इंधन दरवाढीमुळेही मालवाहतूकदार त्रस्त झाले आहे. यामुळे येत्या २८ जून रोजी देशभरातील काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. अशी माहिती ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांना दिली.
केंद्र सरकारचा करणार निषेध
कोरोना महामारीच्या स्वतःच्या आणि कुटूंबियांची पर्वा न करता अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नयेत, म्हणून अहोरात्र देशभरात मालवाहूतक ट्रक रस्त्यावर धावत आहे. मात्र, आज इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात मालवाहतूकदारांना फटका बसतो आहे. सध्या देशभरातील ६५ टक्के मालवाहतूक ट्रक हे डिझेवर चालते. त्यामुळे डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतुकीमध्ये भाडेवाढ करावी लागणार आहे. परिणामी देशभरातील नागरिकांना महागाईचा सामना करावे लागणार आहे. २०१४ ला पेट्रोल ५० रुपये आणि डिझेल ६० रुपये प्रतिलीटर होते. आता २०२१ मध्ये डिझेल ९१ रुपये तर पेट्रोल १०२ रुपये प्रतिलीटर झाले आहे. आतापर्यंतचीही ही विक्रमी इंधन दरवाढ आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कराच्या बोज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी पातळी गाठली आहे. त्यामुळे आज सर्वाधिक मोठा फटका वाहतूक क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे येत्या २८ जूनला संपूर्ण देशभरतील मालगाडयांवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
देशातील मालवाहतूक बंद करणार -
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंह यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, वाढत्या इंधन दरवाढीमुळे मालवाहतूक उद्योग चिंतेत पडलेला आहे. आज महागाईमुळे 30 ते 35 रुपयांची वस्तू शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनतेची लूट सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारने इंधनावर लावलेले जे कर आहेत, या करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, तीन महिन्यानंतरच डिझेलच्या दरात वाढ करावी, डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणायला हवे तसेच मालवाहतूक उद्योगाला वाचवण्यासाठी इंधनाच्या दरवाढला स्थगिती देण्यात यावी असेही ते म्हणाले.