मुंबई -येथील लोअर परळ परिसरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेमध्ये वाहन कर्जाच्या नावाखाली 1 कोटी 65 लाख रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये १३ वाहनांवर बनावट नावांच्या आधारावर कर्ज घेतले होते. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्याविरोधात मुंबई एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
डीलर, कागदपत्रे, चलन,आरसी बुकही बनावट -
मुंबईतील लोअर परळ येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेमध्ये संतोष कांबळे नावाचा एजंट हा गेल्या दोन वर्षापासून वाहन कर्जांच्या संदर्भात काम करत होता. या शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या असलेल्या संतोष कांबळे याने बनावट आरसी बुक, बनावट चलन व बनावट वाहनांच्या कागदपत्रांवर बँकेमध्ये गेल्या दोन वर्षात १३ वाहन कर्जाचे कागदपत्र जमा केले होते. कल्याणमधील एका शो रूम डीलरचा पत्ताही यासाठी दिलेला होता. गेल्या काही महिन्यांपासून या शाखेतून मंजूर झालेल्या १३ वाहन कर्जाचे हप्ते थकल्यामुळे याची चौकशी करण्यात आली. तर कल्याणमधील वाहन डीलर हा बनावट असल्याचे समोर आले. यासंदर्भात एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.