बिनव्याजी कर्जाचं आमिष दाखवून फसवणूक नाशिक : दुकानदारासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना 2 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं आमिष दाखवून मोठी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्य संशयित महिलेसह 6 एजंटांविरुद्ध इंदिरा नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
फसवणुकीची व्याप्ती एक कोटीपर्यंत :प्रत्यक्षात कर्ज मंजूर न करता प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्रांसाठी 12 ते 15 हजार रुपये नागरिकांकडून वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळं बालाजी फायनान्स सर्व्हिसेस, एस. के. फायनान्स कंपनीच्या सहा संचालकांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांकडून 12 ते 15 हजार उकळले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर भागातील गमणे मळा परिसरात गेल्या महिनाभरापासून संशयित टोळी बालाजी फायनान्स सर्व्हिसेस, एस.के. फायनान्सच्या नावानं ग्राहकांची फसवणूक करत होते. शून्य टक्के व्याजासह 40 टक्के सबसिडी देण्याचं अमिष संशयित टोळीनं ग्राहकांना दिलं होतं. तसंच कागदपत्रासाठी प्रत्येक ग्राहकांकडून टोळी 12 ते 15 हजार रुपये उकळत होती.
इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल :नरेश शेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत कंपनीच्या 20 एजंटांनी संशयित कृष्णा रेड्डी, माधवन कृष्णन, लतिका खालकर, नवनाथ खालकर, सुगत औटे यांनी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना बिनव्याजी कर्ज देण्याचं अमिष दिलं होतं. प्रत्येक अर्जदाराकडून त्यांनी 12 हजार आगाऊ रक्कम घेतली होती. या टोळीनं 400 ग्राहकांकडून एका महिन्यात 4 लाख 80 हजार रु. घेतले होते. मात्र, कर्ज कोणालाही दिलं नाही. हा फसवणुकीचा प्रकार असल्यानं ग्राहकांनी दिलेली रक्कम मागितली असता टाळाटाळ करण्यात येत होती.
वकिलांची ही होणार चौकशी :आमच्याकडं आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोफत व्याज, सबसिडीचं अमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्यात आलीय. हा आकडा कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या कर्जप्रकरणामुळं नोटरी झालेल्या तीन संशयित वकिलांचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे, असं पोलीस निरीक्षक सुरेश आवाड यांनी सांगितलं.
हैदराबादशी कनेक्शन? : बालाजी फायनान्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही हैदराबाद येथील कंपनी असल्याचं संशयितांनी सांगितलंय. त्यामुळं नाशिकमधील या फसवणुकीचं हैदराबादपर्यंत जाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत येत आहे.
हेही वाचा -
- हो मला 'वेड'च लागलंय, ते शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही; छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर
- सना खान हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे; मोबाईल, लॅपटॉप जप्त
- जामिनासाठी नवाब मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात जावं - मुंबई उच्च न्यायालय