मुंबई - राज्यभरातील खासगी शिकवणीचे (कोचिंग क्लास) मालक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे हे जाणीवपूर्वक या महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी देत नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून खासगी शिकवणी मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.
कोचिंग क्लास मालक आणि शिक्षण मंत्र्यांचे आर्थिक झोल; माजी मंत्री अनिल देशमुखांचा आरोप
राज्यभरातील खासगी शिकवणीचे (कोचिंग क्लास) मालक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याने खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला.
अलीकडेच गुजरातमध्ये सुरत येथे खासगी शिकवणी वर्गाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये 20 ते 22 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली असून महाराष्ट्रात एक लाख दहा हजाराच्यावर खासगी शिकवण्या आहेत. एकट्या मुंबईत 30 ते 35 हजार खासगी शिकवणी आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर विद्यार्थ्यांना बाहेर पडायला जागा नाही, विशेष म्हणजे या शिकवणींवर कोणाचे निर्बंध नाहीत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, असाही आरोप अनिल देशमुख यांनी केला.
सुरत सारखी घटना महाराष्ट्रात व मुंबईत घडू शकते, अशी कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही. 2017 मध्ये खासगी शिकवणी विषयी नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. बारा लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता 2018 मध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला. परंतु, मसुदा पाठवूनही त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी खासगी शिकवणीचा नवीन कायदा तयार करू, असे आश्वासन दिले होते. कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत शिकवणी मसुद्याला विलंब केला जात आहे,असा आरोप अनिल देशमुख यांनी शेवटी केला.