महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेखणी बंद आंदोलनाचा फटका; अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विद्यापीठांचा निर्णय - mumbai latest news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी आपल्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला आहे.

लेखणी बंद आंदोलनाचा फटका; विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय
लेखणी बंद आंदोलनाचा फटका; विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय

By

Published : Sep 30, 2020, 2:52 AM IST

मुंबई -सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजना आदी मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून राज्यातील 14 विद्यापीठांमध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा फटका अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसला असून राज्यातील चारहून अधिक विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 14 विद्यापीठांमध्ये मागील तीन दिवसांपासून तब्बल 17 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या फटक्यामुळे राज्यातील बहुतांश विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा संकटात सापडल्या आहेत. यामुळेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी आपल्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला आहे. यासोबतच उद्या इतर विद्यापीठांकडूनही या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. यासोबतच या विद्यापीठांमध्ये एटीकेटीच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली असल्याचे या विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.

सोमवारी, 28 सप्टेंबर रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत सामंत यांनी विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगापासून आश्वासित प्रगती योजना संदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यावर एका महिन्यातच अंमलबजावणी केली जाईल त्यासाठीचे आश्वासन दिले होते. तसेच हे लेखणीबंद आंदोलन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तातडीने मागे घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.

परंतु या बैठकीनंतर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लेखी आश्वासन देण्यात आले नसल्यामुळे हे लेखणीबंद आंदोलन सुरूच ठेवले असून सरकारने आता यासाठीचे परिपत्रकच काढून ते जाहीर करावे, अशी मागणी राज्यातील विद्यापीठ अधिकारी कर्मचारी संघटनांकडून आता लावून धरली जात आहे. यामुळेच बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी मुंबईत कलिना आणि फोर्ट संकुलात लेखणीबंद आंदोलनाच्या माध्यमातून दिवसभर निदर्शने केली जाणार आहेत. त्यासोबतच राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ शिक्षक अधिकारी व कर्मचारी समन्वय समितीचे प्रमुख दीपक घोणे यांनी दिली

ABOUT THE AUTHOR

...view details